मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ तारखेपासून पन्हा बेमुदत संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ तारखेपासून पन्हा बेमुदत संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 01, 2024 07:57 PM IST

Resident Doctors Strike in Maharashtra : राज्यातील निवासी डॉक्टर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ७ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था कोसळण्याची शक्यता आहे.

Resident Doctors Strike in Maharashtra
Resident Doctors Strike in Maharashtra

आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले असून ७ फेब्रुवारीपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. या आंदोलनामुळे ओपीडी रुग्णांवर उपचार मिळण्यास अडचणी येणार असून रुग्णांना अडचणींना सोमोरे जावे लागू शकते. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने या संपाला पाठींबा दिल्याने राज्यातील रुग्ण सेवा बाधित होण्याची शक्यता वर्तवविण्यात येत आहे.

 मानधनवाढ, वसतिगृहांची दुरावस्था, प्रलंबित भत्ते  या मागण्यांविषयी अनेक वेळी निवेदने देऊनही सरकारने दाद न दिल्याने डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत.

निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने आपल्या मागण्यांबाबत सरकारकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र सरकारने नेहमी तोंडी आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली आहे. यामुळे त्यांचे मुलभूत प्रश्न अजूनही तसेच आहेत. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी जानेवारी २०२३ मध्ये संप केला होता. त्यावेळी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र वर्ष उलटले तरी सरकारकडून ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

मार्ड संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करणे, विद्यावेतनाचे नियमन करणे, प्रलंबित विद्यावेतनाची रक्कम अदा करणे आणि विद्यावेतनात वाढ करणे या प्रमुख मागण्या आहेत.

WhatsApp channel