Maharashtra Monsoon Update: अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तसेच मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेल्याने गैरसोयीचा सामना केलेल्या शहरी नागरिकांनाही दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्यापासून मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. आज (रविवार) मान्सूनने राज्यातून निरोप घेतला. सध्या खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून मान्सूनच्या माघारीमुळे आता दिवाळीत पाऊस बरसणार नाही. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. यंदा मान्सूनचा मुक्काम तब्बल एक महिना लांबला होता.
यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस बरसला होता. पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही.
राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२३ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल २३ टक्के अधिक पाऊस जास्त झाला आहे.
माघारीच्या मान्सूनने मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीने शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली होती. काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटू लागले होते. पावसाने शेतीचे मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडलासापडला असून सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. सामान्यपणे दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून राज्यातून निरोप घेतो मात्र यंदा मान्सून २३ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात रेंगाळला होता.