Weather News: राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसाार, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. याशिवाय, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यात येत्या ४ ऑगस्टपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. तर, ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा ४१ टक्के जास्त पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रात ४५ टक्के, मराठवाड्यात २७ टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा ३६ टक्के जास्त पाऊस झाला.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटीमुळे नद्यांना पूर आला, घरांना पूर आला, पूल उध्वस्त झाले आणि रस्ते उद्ध्वस्त झाले.लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) तसेच राज्य आपत्ती निवारण दल आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी मदत कार्य केले असले तरी अनेकांच्या जिवंत सापडण्याची शक्यता धूसर असल्याचा इशारा देत दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी किमान १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या