Maharashtra Rain: राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाहतूक विस्कळीत, रेल्वे आणि विमानांना उशीर झाला आणि मालमत्तेचे ही नुकसान झाले. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केला. पुण्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला आणि कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढण्यात येणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या ४८ तासांत लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासलातून ३५ हजार ३०० क्युसेक इतका विसर्ग सुरु होता, तो आता वाढवून ४० हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे. तर, कोयनेतून सध्या २० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे, तो उद्या पहाटे ३ वाजता ३० हजार क्युसेक इतका होईल. सकाळी ९ वाजता तो ४० हजार क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. ५१७.५ मीटर इतकी पाणीपातळी कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यातील शाळा उद्या (शुक्रवारी, २६ जुलै २०२४) बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पुणे आणि सातारा येथील शाळा उद्या बंद राहणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्या सुरूच राहणार असल्याची माहिती दिली. मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे.मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्या नियमितपणे सुरू राहतील, असे सांगण्यात आले.