मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Update: राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आजही अनेक भागात यलो अलर्ट

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आजही अनेक भागात यलो अलर्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 12, 2022 09:22 AM IST

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आजही अनेक भागात यलो अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आजही अनेक भागात यलो अलर्ट

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिक काढायची वेळ आली असताना पावसामुळे आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाने आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. काल विदर्भात पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

अकोल्यात बोर्डी इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला. गेल्या कित्येक दशकात इतका पाऊस झाला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या पावसामुळे गावातील अनेक घरात पाणी शिरलं. तसंच काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमध्येही पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही भागातली वाहतूकही विस्कळीत झाली आहे. गेल्या २ ते ३ दिवसांपासून पाऊस पडत आहे. ढगांच्या गडगडाटासह सुरू असणाऱ्या पावसात वीज कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगलीला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सांगलीत तुफान पाऊस झाला असून यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूरमध्येही अनेक भागात पावसाने थैमान घातले. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. शेतीमध्येही पाणी साचल्याने सोयाबीन, भूईमुग, भात पिकांचे नुकसान झाले आहे.sura

बीडमध्ये अनेक नदी नाल्यांना पूर आला असून बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. बिंदुसरा नदीला या पावसानं पूर आला आहे. त्यामुळे नागझरी येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्याभरात विदर्भात पावसाचे प्रमाण कमी जास्त राहील. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर पावसाचे ढग आहेत. त्याचा सर्वाधिक प्रभाव मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात दिसून येत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या