राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून रायगड सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला यलो अलर्ट दिला असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात पाणी जमा झाल्याने या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्याने कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील दरडप्रवण अन पूरप्रवण गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातही जोरदार पाऊस पडत असून अमरावतीत अंबा नाल्याला आलेल्या पुरात १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. परवेज खान अफरोज खान असं पुरात वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे
कोकणातील मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. चिपळूण, खेड येथे रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने रेल्वे गाड्या स्थानकात थांबून आहेत. दिवाणखवटी स्थानकाजवळ रूळावर दरड कोळल्यामुळे कोकण मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. जोरदार पावसाने कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. तुतारी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस दोन तास ऊशीराने धावत होत्या तर एर्नाकूलम- हजरत निजामुद्दीन नेत्रावती एक्स्प्रेस तर सात तास ऊशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
कोकणात तसेच खोपोली, लोणावळा आणि खालापूर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. कमरेइतक्या पाण्यातून वाहनधारक रस्ता काढत आहेत. येथे दोन ते अडीच फुटांपेक्षा जास्त पाणी साचलं आहे. याठिकाणी सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या चिंचवली येथील चिंचवली बोरघर मार्ग पाण्याखाली गेला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रविवारी शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून सोमवारी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार, तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
तसेच शहरात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काल सकाळपासून आज सकाळपर्यंत सरासरी ११५.८१ मिमी पावसाची नोंद झाली असून मुंबईत १७ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे