Maharashtra Rain: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगडमध्येही पावसाने धुमशान घातले. दरम्यान, रायगड किल्ल्यावर रविवारी संध्याकाळी ढग फुटीप्रमाणे पाऊस कोसळला असून सुमारे १०० पर्यटक अकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी रायगड किल्ला येत्या ३१ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर रायगड पोलिसांनी किल्ल्याभोवती बंदोबस्ताची व्यवस्था केली. तसेच परिसरात नाकेबंदी केली.
अतिवृष्टीमुळे सोमवारपासून रायगड किल्ला पर्यटक बंद करण्यात आला.रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला. कोणालाही गडावर जाण्याची परवानगी नाही. रायगड किल्ला परिसराजवळ सुमारे १५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटक पावसात अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत पर्यटक धोकादायक मार्गावरून प्रवास करताना दिसले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पावसळ्यात दरवर्षी रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येतो. आज रायगड परिसरात ऑरेज अर्लट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांसाठी (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) आज (९ जुलै २०२४) सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्टमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहणार आहेत. हा निर्णय प्राथमिक व माध्यमिक शाळांबरोबरच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांना लागू आहे.
हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून मंगळवारी शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.