Heavy rain in Thane: कल्याण- डोंबिवलीत परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळ्यांची दाणादण उडाली आहे. कल्याणच्या पिसवली गावातील सुमारे २०० ते २५० घरांत पाणी शिरले आहे. याशिवाय, ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यांत रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गुरुवारी सकाळी पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पालघरमधील सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे मनोर येथील पूल पाण्याखाली गेला असून वाडा ते मनोर दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली. येत्या तीन तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत भारतीय हवामान खात्याने सकाळी १० वाजता पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे पालघरमधील ससून नवघर येथे विविध यंत्रणांनी हाती घेतलेली खोदाई यंत्र आणि त्याच्या ऑपरेटरची शोधमोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे. २९ मे रोजी एका आगामी पाणी प्रकल्पाच्या बोगद्यातील माती खचल्याने खोदाई यंत्र आणि त्याचा ऑपरेटर गाडला गेला होता. ठाणे शहर आणि जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत शहरात ३५.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या तुरळक घटना घडल्या. गुरुवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत शहरात २६.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे शहरात आतापर्यंत २२८.९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ५०.७० मिलिमीटर पाऊस झाला होता.
मुंबई शहरातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. मुंबईतील विविध भागात गेल्या २४ तासांत ६.३ ते २० मीलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान ३० आणि २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या