येत्या रविवारी म्हणजेच १८ ऑगस्टला समाज कल्याण अधिकारी, गट- ब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या संवर्गांची चाळणी परीक्षा आहे आणि त्याच दिवशी आयबीपीएसची क्लर्कची परीक्षाही आहे. तर दुसरीकडे २५ ऑगस्टला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यादिवशीही आयबीपीएसची परीक्षा आहे. यामध्ये काही विद्यार्थी आयबीपीएसची तयारीही करत होते. त्यामुळे त्यांना एका कोणत्यातरी परीक्षेला मुकावे लागणार होते. यासाठी एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे.
IBPS Clerk व राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या असल्याने आ. सत्यजीत तांबेंनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परीक्षेच्या तारखा बदलण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील IBPS लिपीक परीक्षा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आयबीपीएसने जानेवारी महिन्यातच या परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्याकडेही एमपीएससीने सरळ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर १८ ऑगस्ट रोजी एमपीएससीकडून समाजकल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण त्याच दिवशीही आयबीपीएसची परीक्षा नियोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील विशेष २५ ऑगस्टला नियोजित होती. पण त्याच दिवशी आयबीपीएस लिपीक परीक्षा असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘एमपीएससी’नेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या परीक्षेच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवदेन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी ज्या तारखेला एमपीएससीच्या परीक्षा नियोजित होत्या त्या तारखेलाच त्या परीक्षा होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. परीक्षार्थींना दोन्ही परीक्षांचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षांची सर्व तयारी झाली आहे. त्यामुळे या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार आहेत. समाज कल्याण विभागाची परीक्षा १८ ऑगस्टला तर राज्यसेवेची पूर्व परीक्षा २५ ऑगस्टला होणार आहे.