महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) परीक्षेसंदर्भातील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या परीक्षेच्या तारखेला आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एक परीक्षेला मुकावे लागणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून २५ ऑगस्ट रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे तर बँकिंग कार्मिक निवड संस्थेकडून (आयबीपीएस) कडूनही त्याच दिवशी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ‘आयबीपीएस’ च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली होती. तर ‘एमपीएससी’ची परीक्षा यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता २५ ऑगस्टला परीक्षा होत आहे. त्याच दिवशी आयबीपीएसची परीक्षा होत आहे. मात्र आता दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उद्या (गुरुवार) सकाळी १० वाजता महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झालीआहे. संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातआंदोलन सुरू केले आहे. २५ ऑगस्टला एमपीएससी तर्फे कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी तसेच नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी परीक्षार्थ्यांनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विद्यार्थ्यांच्याया आंदोलनाचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांशी चर्चाकरत त्यांच्याआंदोलनाला पाठिंबा दिला. दुसरीकडे, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनीही याप्रश्नी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आणि अखेरआयोगाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तसेच अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बैठक बोलावली आहे. आयोगाने बैठक गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) परीक्षा आणि मराराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. त्यांचा समावेश करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आयोगाकडून यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.