Maharashtra public service commission : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आता कृषी विभागातील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयानुसार, १डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कृषी विभागाची पदे समाविष्ट करण्याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे १६ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा-२०२४ साठी २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात आले होते.
राज्यसेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागातील पदांचा सामावेश झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश झाला आहे. लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेत कृषी उपसंचालकाची ४८ पदे, तालुका कृषी अधिकारी ५३ पदे आणि कृषी अधिकाऱ्यांची १५७ पदे समाविष्ट केली आहेत.
कृषि सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृतीसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्ज /विकल्प सादर करण्याचा कालावधी २७ सप्टेंबर २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात अन्य संस्थांची भरती प्रक्रिया, विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, मनुष्यबळ, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन राज्यसेवा पूर्व परिक्षेचे आयोजन दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.