Eknath Khadse announces Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते भावूक झाले. 'यापुढं निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी तुमच्यासोबत अनेक वर्षे आहे. तुम्ही अनेक वर्षे मला आधार दिलात आणि आशीर्वाद दिलात. तुमच्या सुख-दु:खात मी सहभागी झालो आहे. जात-धर्म न बघता मी सर्वांना मदत केली आहे. पुढची निवडणूक मला दिसेल की नाही हे देवच ठरवेल... माझी तब्येत चांगली असेल तर ते घडेल. मी पुढच्या निवडणुकीत असेन किंवा नसेन. पण या निवडणुकीत रोहिणीताईंना निवडून द्या, अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करेन, असं आवाहन त्यांनी केलं.
एकनाथ खडसे यांनी १९८९ ते २०१९ या कालावधीत सलग सहा वेळा भाजपचे आमदार म्हणून जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघाची धुरा सांभाळली होती. तत्पूर्वी, युती सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली होती. त्याचबरोबर, विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं होतं. मात्र, फडणवीसांच्या कार्यकाळात भूखंड घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. पक्षात कुठलीही संधी नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खडसे यांनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि अखेर तीन वर्षांनंतर अविभाजित राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षासोबत राहणं पसंत केलं होतं.
भाजपनं खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यानंतर आणि नंतर केंद्रीय राज्यमंत्री बनवल्यानंतर भाजपमधील त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, रोहिणी खडसे याच राजकारणातील त्यांच्या वारसदार असतील, असे संकेत सोमवारी त्यांनी दिले.
मी भाजपमध्ये परतण्यास उत्सुक नव्हतो, पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी आग्रह धरला. मी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझा स्कार्फ देऊन सत्कार केला आणि मी भाजपचा भाग झालो असल्याचं जाहीर केलं.