Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?

Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?

Nov 14, 2024 01:22 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : पुण्यातील भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील यावेळची निवडणूक खूप वेगळी असेल.

Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?
Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक अनेकार्थांनी वेगळी आहे. पहिल्यांदाच या निवडणुकीत सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. तर, ५५ मतदारसंघांत एकाच नावाचे अनेक उमेदवार आहेत. पुण्यातील भोसरी आणि चिंचवड मतदारसंघासाठीही ही निवडणूक वेगळी आहे. कारण, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच इथं कोणताही तगडा तगडा अपक्ष उमेदवार नसताना मतदान होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि राजकीय कौशल्याने मतदारांना भुरळ पाडणाऱ्या अपक्षांच्या विजयाची परंपरा आहे. २००९ मध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून शिवसेनेचे (अविभाजित) उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. याच विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून भोसरीतून शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगलाताई कदम यांचा पराभव केला. या निकालांमुळं अनेकांचा आत्मविश्वास उंचावला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही हीच परंपरा कायम राहिली. या निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादीनं (अविभाजित) तिकीट नाकारलं होतं. त्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि भोसरीत विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पराभव केला.

२०१९ मध्ये अपक्षानं खेचली १ लाखाहून अधिक मतं

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी विद्यमान आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांना आव्हान देत दुसऱ्या क्रमांकाची १ लाख १२ हजार मतं घेतली. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांनी भोसरीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ८१ हजारांहून अधिक मतं मिळवत अपक्ष उमेदवाराची ताकद दाखवून दिली.

यावेळची निवडणूक वेगळी

यावेळची भोसरी किंवा चिंचवडची निवडणूक पहिल्यांदाच प्रबळ अपक्ष उमेदवाराविना होत आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. तर विरोधी महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे. या निवडणुकीचं महत्त्व आणि अपक्ष उमेदवाराचा उपद्रव लक्षात घेता बंडखोर उमेदवारांना खूश करण्यात दोन्ही आघाडी यशस्वी ठरल्या आहेत. 

चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार नाना काटे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यांना शांत करण्यात यश आलं आहे. भोसरीत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांनीही उमेदवारी मागे घेण्याचं मान्य केलं आहे. यंदा चिंचवडमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर (अजित पवार) अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, भोईर हे स्वबळावर विधानसभा निवडणूक जिंकू शकणारे तगडे अपक्ष उमेदवार नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर