मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आदित्य ठाकरेंना धक्का! सुरज चव्हाण यांना महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक

आदित्य ठाकरेंना धक्का! सुरज चव्हाण यांना महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 17, 2024 11:00 PM IST

BMC Khichdi Scam : मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे.

suraj chavan with aditya Thackeray
suraj chavan with aditya Thackeray

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचा कथित डेड बॉडी बॅग घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी ईडीकडून कारवाई सूरू करण्यात आली असून पहिली अटक करण्यात आली आहे. 

मुंबई पालिकेतील १०० कोटींच्या खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे  निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. आज त्यांना अटक करण्यात आली. 

सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले असून सध्या ते ठाकरे गटाचे सचिव आहेत. आदित्य ठाकरेंचे खास म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या आकडेवारीचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी तसेच ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था  केली होती. याला केंद्र सरकारनेही अर्थसहाय्य दिले होते. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी बनवण्याचं व पुरवठा करण्याचा ठेका दिला होता. चार महिने ही योजना सुरू होती. त्यानंतर या कामात मोठी घोटाळा झाल्याचा आरोप करत सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेतले होते.

WhatsApp channel