मराठी माणसांसाठी राजकारण करणाऱ्या मनसे व ठाकरे गटाला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, ही अनेक मराठी जणांसोबतच शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण जो माझ्या आजारावर टिप्पणी करतो त्याच्यासोबत आम्ही कधीच एकत्र येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी विधानसभेवेळी स्पष्ट केले होते. दोन्ही भावांनी याआधीही एकमेकांस टाळी देण्यास नकार दिला होता. गेल्या जवळपास २० वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेले हे दोन ठाकरे बंधू वेगवेगळ्या वाटेने चालत आहे. मात्र आज एका समारंभानिमित्त राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने तसेच दोघांमध्ये संवाही झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना फुटीनंतर राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे अनेकांना वाटत होते. मात्र तसे होऊ शकले नाही. पण एका लग्न समारंभाच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे एकत्र आले. दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले. यावेळी उद्धव आणि राज हे आजूबाजूला उभे राहून वधूवरांवर अक्षता टाकत असल्याचे फोटो व व्हिडिओमध्ये दिसत आहे. राजकीय मतभेद विसरून भाच्याच्या लग्नाला दोन्ही मामांनी हजेरी लावत कौटुंबिक जिव्हाळा जपल्याची चर्चा समारंभात होती.
दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात पार पडत असलेल्या भाच्याच्या या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी राज आणि उद्धव दोन्ही मामा एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधू वरांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याचे काही व्हिडिओ, फोटो आता समोर आले असून राज व उद्धव गप्पा मारताना दिसत आहेत.
मागील वर्षी २२ डिसेंबर रोजी जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळीही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर बरोबर एक वर्षाने आज विवाहाच्या निमित्ताने दोघे एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याच्या लग्नाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी रश्मी ठाकरे यांनी राज यांचे स्वागत केले होते. मात्र त्या सोहळ्यात उद्धव व राज यांची भेट झाली नव्हती.
संबंधित बातम्या