आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू राहणार असून या अभियाना अंतर्गत ८३० किलोमीटरचे अंतर पारकेले जाणार आहे. या अंतर्गत १३ लोकसभा तसेच २७ विधानसभा मतदारसंघ कव्हर केले जातील. याला मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान असे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, या अभियानाच्या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच यासंपूर्ण अभियानातनेते व पदाधिकारी हॉटेल वगैरे सुविधा न घेता टेंटमध्ये राहणार आहेत. जेवण स्वतः बनवून खाणारआहेत. बुलढाणा, सिंदखेड राजा, रिसोल, वाशिम, हिंगोली, परभणी असा दौरा करत यात्रा मुंबईत दाखल होणार आहे. या अभियानाच्या समारोप कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असेल. या अभियानात संजय राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आदि नेत्यांच्या सभाही ठिकठिकाणी घेण्यात येतील.
अंधारे म्हणाल्या की, शिवसेना ठाकरे गटाचे जनता न्यायालय पार पडल्यानंतर नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया सुरू झाल्या आहेत. रविंद्र वायकर, किशोरी पेडणेकर व सुरज चव्हाण यांना ईडीने त्रास द्यायला सुरूवात केली आहे. तर वायकर व पेडणेकर यांनी शिंदे गटात जायचं ठरवलं असतं तर कारवाई बंद झाली असती. मात्र सध्या त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.