Maharashtra Assembly Elections 2024: भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष महायुतीत नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. ५ जागांची मागणी करत शिवसंग्रामने महायुतीवर दबाव वाढवला होता. तसेच मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची मानसिकता नसल्याची टीका शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी केली होती. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने बीडमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep kshirsagar) यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
बीडमध्ये शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली झाली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. शिवसंग्रामकडून होत असलेल्या या मागणीमुळे आता बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील प्रवेशामुळे बीड विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी धोक्यात आली असून या ठिकाणी शरद पवार गट मराठा कार्ड खेळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ज्योती मेटे यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशनंतर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. ज्योती मेटे बीड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांनी त्यांना बीड मतदारसंघासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा पक्ष प्रवेश केला असल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले होते.
मेटे साहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले होते. मनोज जरांगे पाटील यांची भेट बीड विधानसभा संदर्भात होती. विधानसभा निवडणुकीच्या रणनीती अनुषंगाने आमची सकारात्मक चर्चा झाली. महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत देण्यासाठी अनुकूल नसेल तर शिवसंग्राम स्वतंत्र लढणार असल्याचंही ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं होते.