मुंबई- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सर्वांचे ज्या निकालाकडे लक्ष लावले होते. तो शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल बुधवारी १० जानेवारी रोजी दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार अपात्रतेवरुन विधीमंडळात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील निकालाचा मुहूर्त ठरला आहे. निकालपत्रातील शाब्दीक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असून सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधीमंडळत आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याबाबत १० जानेवारीपर्यंत निकाल देणे बंधनकारक होतं. यानंतर आता निकालाची तारीख समोर आली आहे. या अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारीला लागणार आहे. बुधवारी ४ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी ४ वाजेनंतर निकालातील ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत तर संपूर्ण निकालाची प्रत शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिली जाणार आहे.
या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत दिली होती. ती मुदत पुन्हा वाढवून १० जानेवारी करण्यात आली होती. अनेक वेळा मुदत वाढवल्यानंतर अखेर आमादार अपात्रतेवर निकालाचा दिवस ठरला आहे.
या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेतला जाणार आहे. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ठाकरे गटाकडून अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकाही करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या