मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अशोक चव्हाणांचा काँग्रेसला पहिलाच मोठा दणका; ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अशोक चव्हाणांचा काँग्रेसला पहिलाच मोठा दणका; ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 24, 2024 04:24 PM IST

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का दिला आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ माजी नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Ashok Chavan supporter 55 former corporators join bjp
Ashok Chavan supporter 55 former corporators join bjp

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा हात सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी भाजपात जाताच त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली. आताअशोक चव्हाण यांनी काँग्रेसला पहिला मोठा धक्का देत नांदेडमधील तब्बल ५५ नगरसेवकांना भाजपमध्ये आणले आहे. या नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे समर्थक आमदार व पदाधिकारी तसेत कार्यकर्तेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का दिला आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ माजी नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना नांदेड मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनंतर अशोक चव्हाण समर्थक आमदार आणि अन्य काही नेतेही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point