‘राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं; फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...' संजय राऊतांचा टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं; फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...' संजय राऊतांचा टोला

‘राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं; फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...' संजय राऊतांचा टोला

Dec 07, 2024 05:38 PM IST

Sanjay Raut On Raj Thackeray : संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झालं आहे,हे स्पष्ट दिसत आहे.

संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणाले होते की, मनसे सरकारमध्ये सहभागी असेल व भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करत फडणवीसांचे अभिनंदन केले व या सरकारच्या निर्णयांना आपला पाठिंबा असेल असंही सांगितलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये राज ठाकरेंना महायुतीत सहभागी करुन घेण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी लोकसभेत खुलेपणाने आम्हाला पाठिंबा दिला, त्याचा खूप फायदा झाला. मात्र विधानसभेत त्यांना सामावून घेणे शक्य नसल्यानं त्यांनी स्वबळावर लढून चांगली मते मिळवली. त्याचं व आमचं विचार जुळतात, यामुळे राज ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सोबत घेऊ,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. यावर पत्रकाराने संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झालं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. फडणवीसांच्या विधानावरुन स्पष्ट झालंय की, राज ठाकरे भाजप सांगेल त्याप्रकारे भूमिका घेत आहेत. त्याबद्दल मला मत व्यक्त करायचं नाही.

लोकसभेत, विधानसभेत आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यायची. एका बाजूला महाराष्ट्रात मुंबईत, मराठीत बोलायचं नाही. गुजराती, मारवाडीत बोला असा आमच्या मराठी लोकांवर भाजपकडून दबाव टाकला जात आहे. त्याच भाजपाचं नेतृत्व करणारे फडणवीस ठरवत आहेत की, राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी,राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं यासंदर्भातील ते पत्ते पिसत बसले असतील तर यासंदर्भातील भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.

राज ठाकरेंनी महायुती सरकारचे अभिनंदन करताना म्हटले की, माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली.पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की," असं म्हणत सूचक इशारा दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर