ठाण्यात मनसेचा राडा! उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ अन् बांगड्या फेकल्या; नंतर कार्यक्रमात घुसले, पाहा VIDEO-maharashtra politics raj thackeray mns workers attack on uddhav thackeray vehicle in thane ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात मनसेचा राडा! उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ अन् बांगड्या फेकल्या; नंतर कार्यक्रमात घुसले, पाहा VIDEO

ठाण्यात मनसेचा राडा! उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ अन् बांगड्या फेकल्या; नंतर कार्यक्रमात घुसले, पाहा VIDEO

Aug 10, 2024 10:28 PM IST

Shiv sena Vs MNS : राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांकडून शेण व बांगड्या फेकण्यात आल्या.

उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या
उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात त्यांच्या वाहनावर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर या घटनेचे पडसाद ठाण्यात पाहायला मिळाले आहेत. राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांकडून शेण व बांगड्या फेकण्यात आल्या. त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसून राडा केला.

त्यामुळे येथे आता मोठा गोंधळ निर्माण झाला. ठाण्यात आज उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा होता. मात्र याठिकाणी मनसैनिकांनी मोठा राडा करत उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकले.

नारळ फेकून अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या -

आक्रमक मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले. त्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलं आहे. तसेच मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्याही फेकल्याचं समोर आलं. 

शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा होता. त्यासाठी उद्धव ठाकरे मुंबईकडून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. नंतर मनसेचे कार्यकर्ते थेट कार्यक्रम सुरू असलेल्या रंगायतन सभागृहात घुसले. मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात -

नौपाडा पोलिसांनी मनसेच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून गडकरी रंगायतन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या गोंधळाच्या वातावरणातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे मेळाव्याला येत असताना राज ठाकरेंच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्याव शेण फेकले.

राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरूअसून ते बीडमध्ये असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवत त्यांच्या दिशेने सुपाऱ्या फेकल्या होत्या.त्यानंतर आता मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाने सुरुवात केलीय आता शेवट आम्ही करणार,असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता.

राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही उद्धव ठाकरे गटाला मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांनीही आपल्या नादी लागू नका, नाहीतर विधानसभेत एकही सभा होऊ देणार नाही, अशा इशारा आजच छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर सायंकाळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.