वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर भाष्य करताना मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे. जर ते विधानसभा निवडणुकीला उतरले नाहीत तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा हल्लाबोलही त्यांनी अकोल्यातून केला. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांच्या संदिग्ध भूमिकेवरही जोरदार टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गटाने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे.
ओबीसी-मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल झाली. मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपुरी गावात यात्रा दाखल झाली. दर्यापूरमार्गे आलेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
यावेळी झालेल्या सभेत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष अन् नेते तयार आहेत. मात्र ओबीसींचं आरक्षण वाचवायला कुणीच तयार नाही. यामुळेच आपण ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मी जर ही यात्रा काढली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. आता वातावरण निवळलंय,असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकारचा निधी परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा लोकांवर टाडा लावून त्यांना कारागृहात टाकलं पाहिजं. महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशा, बंगालमध्ये तसेच अन्य राज्यातही आहे. परराज्यातील मराठी माणसानं काय करायचं? समाजात द्वेष पसरवणारी ही वक्तव्ये आहेत. यामुळे समाजासोबतच देशही दुभंगतो. यूएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्टनुसार अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे.
रोहित पवारांनी रोज कॅमेऱ्यासमोर येऊन फालतू बोलायची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करायची सवय थांबवावी. तुमची बडबड थांबवा. आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका असं सांगत वंचित बहुजन आघाडीने शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना इशारा दिला आहे.
वंचितने ट्विट केले आहे की, रोज कॅमेऱ्यासमोर येऊन फालतू बोलायची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करायची ही सवय थांबवा. आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका. महाराष्ट्राची फसवणूक आणि खोटे बोलणे थांबवा. तुमच्या आजोबांना त्यांच्या स्वतःच्या इतिहासाबद्दल विचारा. आम्ही आठवण करून द्यावी का? १९७८मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन करणाऱ्या तुमच्या आजोबांच्या सरकारला तत्कालीन जनसंघाचाही पाठींबा होता. जनसंघाचा पुलोद सरकारमध्ये समावेश होता. उत्तमराव पाटील,जयवंतीबेन मेहता हे जनसंघाचे आमदार त्या सरकारमध्ये मंत्री होते. सोनिया गांधींना इटालियन म्हणणारे आणि १९९८मध्ये भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस पक्ष फोडणारे तुमचे आजोबा होते. २०१४ मध्ये तुमच्या आजोबांनी भाजपची धुरा सांभाळली होती. भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. विसरलात का?
गडचिरोलीमध्ये आरएसएसला शेकडो एकर जमीन कोणाच्या सरकारने दिली होती? तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये भाजपसोबत रातोरात महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. २०२३ मध्ये तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीशी हातमिळवणी केली होती. महाविकास आघाडीच्या ज्या १०-१२ आमदारांनी क्रॉस वोटींग करून विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवारांना जिंकवले, ते चंद्रावरून आले होते का? त्याबद्दल तुम्ही कॅमेऱ्यासमोर काहीच का बोलत नाही? जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यावर तुम्ही गप्प का आहेत? तुमचा मूर्खपणा थांबवा. तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे,हे जनतेला कॅमेरासमोर येऊन सांगा! महाराष्ट्राची फसवणूक आणि दिशाभूल थांबवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात मारल्या गेलेल्या ३०००दलितांच्या रक्ताने तुमच्या आजोबांचे हात माखले आहेत. १९९२ च्या दंगलीतही त्यांचा हात होता. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका.