काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी राजेंनी भाषणात म्हटले की, २००९ च्या वेदना मी अजून विसरलेलो नाही. असे म्हणत त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी यापूर्वीच केली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याच पक्षाने संभाजी राजेंना पाठिंबा जाहीर केलेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीने संभाजी राजेंना लोकसभेचे तिकीट देण्याची ऑफर दिली आहे. मात्र यासाठी महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता संभाजी राजेंनी अपक्ष म्हणून राजकीय वाटचाल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने छत्रपती संभाजी राजेंना लोकसभेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी राजेंना आपल्याकडे खेचण्याची चाल महाविकास आघाडीने खेळली आहे.
लोकसभेचे तिकीट हवे असल्यास संभाजी राजेंनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश करावा लागेल.या अटीवर महविकास आघाडीने राजेंना लोकसभेचे तिकीट देणार आहे. कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास कोल्हापूर मतदारसंघातून संभाजी राजेंना उमेदवारी मिळू शकते. याबाबत महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षात एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या या ऑफरबाबत संभाजी राजेंकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. महाआघाडीचा प्रस्ताव स्वीकारल्यास संभाजी राजे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीची ताकद वाढली असून आता वंचित बहुजन आघाडीचीही मविआत एंट्री झाली आहे. मात्र अजूनही जागापाटपाचा निर्णय न झाल्यानं महाआघाडीत प्रवेश झाला नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश करण्यात आल्याची घोषणा मविआच्या नेत्यांनी केली होती. मात्र, अजूनही समावेश झाला नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय.
महाविकास आघाडीत लोकसभेच्या रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या ७ मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही. जागावाटपासंदर्भात आता २ फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. महाआघाडीकडून १० फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सोडवायचा प्रयत्न आहे.