maharashtra assembly elections 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे पडघम कधीही वाजू शकतात. महायुती सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक आज पडली. त्यामुळे येत्या २४ तासात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्नसुरू केला आहे. लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक ठरली असून महायुतीने शेवटच्या टप्प्यात अनेक लोकप्रिय घोषणांचा धडका लावून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. याला काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रासाठी जाहीरनामा बनवण्याचं काम सुरू असून या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, तरुणांसोबत सर्वसामान्य जनतेला आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख ६ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड दिल्लीतील बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला (ladki bahin Yojana) टक्कर देण्यासाठी महालक्ष्मी योजना (Mahalakshmi yojana) आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजनाआहे. महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याची तरतूदही केली जाऊ शकते.
त्याचबरोबर तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी बेरोजगार भत्ता देण्याची घोषणाही काँग्रेसकडून होऊ शकते. या योजनेतून बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देण्याचं आश्वासन काँग्रेसकडून दिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर प्रत्येक कुटूंबाला २५ लाखाचं विमा संरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी काँग्रेसकडून कृषी समृद्धी योजना आणली जाऊ शकते. तसेच शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर दलित व आदिवासींसाठी काही योजनांची जाहीरनाम्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.