एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? पडद्याआड नक्की काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? पडद्याआड नक्की काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? पडद्याआड नक्की काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story

Dec 06, 2024 07:07 PM IST

Devendra Fadnavis : विधानसभा निकाल लागल्यानंतर १२ दिवस महायुतीत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. निकाल लागल्यापासून ते शपथविधीपर्यंत महायुतीत काय-काय घडलं याची इनसाईड स्टोरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून १२ दिवस उलटल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. भाजपकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्यानंतर तसेच शपथविधी कार्यक्रमाची तारीखही जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होणार की, नाही? याबाबत संभ्रम होता.शपथविधी सोहळ्याला काही तास राहिले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांची मनधरणी केली. शपथविधी सोहळ्यानंतर अमित शाह यांच्याशी बैठक होण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मानापमान नाट्यावर अखेर पडदा पडला आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. विधानसभा निकाल लागल्यानंतर १२ दिवस महायुतीत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. निकाल लागल्यापासून ते शपथविधीपर्यंत महायुतीत काय-काय घडलं याची इनसाईड स्टोरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या आपल्या सहकाऱ्यांबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद कसे मान्य केले, याचा खुलासा केला. फडणवीस यांनी खातेवाटपाबाबतही भाष्य केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीसांनी आपल्या सरकारच्या कामकाजावर आणि मित्रपक्षांशी असलेल्या संबंधांवर मोकळेपणाने चर्चा केली. फडणवीस म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येक विषयावर चर्चा आणि सामूहिक निर्णय आवश्यक आहे. सरकार स्थापनेला अनावश्यक विलंब झाला नसून शिंदे कशावरही नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असावा, कारण आमदार जास्त आहेत, हे मान्य केले होते. शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदावरून मतभेद असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, पक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडल्यास पक्ष टिकू शकत नाही. हे मी शिंदेजींना समजावून सांगितले.

एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये न जाता समन्वय समितीचे प्रमुख पद घ्यावे आणि महायुतीचा कारभार व्यवस्थित हाकण्यावर देखरेख करावी, असा सल्ला काही शिवसेनेच्या नेत्यांनी दिला होता. शिवसेनेच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आपल्याचा पक्षाचा व्हावा, असे वाटत होते. माझे आणि एकनाथ शिंदेंचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिंदे हे भावनिक स्वभावाचे आहेत, तर अजितदादा व्यावहारिक राजकारण करतात. मी दोघांशी जुळवून घेतले आहे. फडणवीस म्हणाले की, गेली अडीच वर्षे माझ्यासाठी रोलर कोस्टर प्रवासापेक्षा कमी नव्हती.

खातेवाटप आणि राजकीय आव्हाने

फडणवीस म्हणाले की, सामूहिक निर्णयाद्वारे खात्यांचे वाटप केले जाईल. गृहमंत्रालय असो वा अन्य कोणते विभाग, आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ. राजकीय आव्हानांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघातानंतर भाजपने अथक संघर्ष केला. आम्ही अडीच वर्षे लढलो आणि आमचे सर्व मित्रपक्ष आमच्यासोबत राहिले.

लोकसभा निवडणूक आणि अजित पवारांवर भाष्य -

महाराष्ट्रातील जनता २०१४ पासून मोदींच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेले हल्ले ही आपली सहानुभूती वाढवणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या कामगिरीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले, पण त्यांनी चांगले काम केले.

निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या वादावर फडणवीस म्हणाले की, हे कार्ड नियमानुसार बनवण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत, त्यांना त्यांची प्रतिमा दाखवण्याची गरज नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या