Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवारांनी राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. आता विधानसभेत जनतेने तुम्हाला जागा दाखवली आहे. कोलांट्या उड्या मारणारा हा माणूस असून आता हा विषय संपला आहे. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपला आहे, असं खळबळजनक विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
शरद पवार म्हणाले होते की, ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून भाजपाने लहान राज्यात पराभव स्वीकारला तर मोठी राज्ये स्वतःकडे ठेवली,अशी टीका शरद पवारांनी केली होती. या टीकेवर गोपीचंद पडळकर यांनी हे विधान केले. लोकसभेत विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्र महायुतीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,असं शरद पवार म्हणाले होते. याला उत्तर देताना पडळकर म्हणाले की, शरद पवारांवर जनतेचा विश्वास राहिला नाही. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत याआधीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दोघामधील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातच,ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती. आता ते जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. निवडून येताच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पुन्हा टीका केली आहे. पवारांनी आता स्वेच्छेने सेवानिवृत्ती घ्यावी असं पडळकर म्हणाले आहेत.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी दुसऱ्या दिवशी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. असा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं,त्यांचा आत्मविश्वास वाढवणं,नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा भविष्यात कार्यक्रम राहील, असा दुर्दम्य आशावाद पवारांनी व्यक्त केला. तसेच मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी की नाही, हा माझा व आमच्या सहकाऱ्यांचा निर्णय राहील. यामध्ये दुसऱ्या लोकांनी मत व्यक्त करू नये, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले,आमच्या लोकांवर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्यांचे विचाराने काम करणारा मोठा वर्ग भाजपसोबत आहे. आमच्यातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढल्या व त्यांना यश मिळालं. त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर चव्हाण साहेब किंवा गांधी नेहरूच्या विचाराने काम करणारे ते होते. पण त्यांनी संपर्क आणि सहयोग भाजपसोबत ठेवला हे नाकारता येत नाही.