गेल्या काही दिवसात महाराष्ट्र काँग्रेस एकापाठोपाठ एक जबर हादरे बसत आहेत.अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकत अन्य पक्षात प्रवेश केला आहे. मुरली देवरी, बाबा सिद्दिकी, अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसला मुंबईत आणखी एक मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त काँग्रेसचा हात सोडून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिवंगत काँग्रेस नेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची मुलगी प्रिया दत्त यांना लोकसभेचे तिकीट देऊन खासदार केले होते. आता त्या काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रिया दत्त शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सांगता सभा मुंबईत पार पडल्यानंतरही मागील काही दिवसांपासून काँग्रेसला लागलेली घर घर कमी होताना दिसत आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर माजी खासदार प्रिया दत्तही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपूडकर, कुणाल पाटील, अमित झनक आणि माधवराव जवळगावकर हे आमदार देखील काँग्रेसमध्ये नाराज असून विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.