Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता इस्लामपूरमध्ये झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी येणार असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीय दृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती आहे, असे विधान शरद पवारांनी केले. त्याचबरोबर मी पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे", असेही पवार म्हणाले.
पवारांच्या या विधानानंतर जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. यावरून शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.
शरद पवारांनी जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे संकेत दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची खुर्ची शरद पवारांनी जयंत पाटलांकडे सरकावल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे खाली पडल्याचे दिसत आहे. या व्यंगचित्रात नाना पटोलेही दिसत आहे.
या व्यंगचित्राखाली लिहिले आहे की,"या खुर्चीने दगा दिला ऐसा की, पद गेले, पतही गेली. पदाविना सत्ता गेली, सत्तेविना मलिदा गेला", असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून डिवचले आहे.
शरद पवार यांनी आज कराड येथे म्हटले की, विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत. कालच शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं होतं. आज त्यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणं योग्य राहील, असंही पवार म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निव़डणूक जाहीर केली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे.
संबंधित बातम्या