मोठी बातमी..! मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला पण आता गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी..! मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला पण आता गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद?

मोठी बातमी..! मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला पण आता गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद?

Nov 28, 2024 08:36 PM IST

Maharashtra Politics : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याची शिवसेना शिंदे गटाने मागणी केली आहे. मात्र भाजप गृहखातं सोडायला तयार नाही,अशी देखील सूत्रांची माहिती मिळत आहे.

गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद ?
गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वाद ?

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एक पाऊल मागं घेत सर्वाधिकार मोदी-शहांना सोपवले. त्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीत होत असलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी आता नवीनच पेच निर्माण झाला आहे. गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सागून पाच दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही किंवा मुख्यमंत्रीही ठरलेला नाही. जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाहीय. महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला तरी एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याची शिवसेना शिंदे गटाने मागणी केली आहे. मात्र भाजप गृहखातं सोडायला तयार नाही,अशीदेखील सूत्रांची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या गुरुवारी रात्री होणाऱ्या बैठकीत गृह खात्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गृहखात्यासाठी अडून आहेत.

महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांपैकी साडे सात वर्षे गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. केवळ महाविकास आघाडीच्या काळात अडीच  वर्षे या खात्याची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे होती.

 

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली होती. प्रचाराचा केंद्रबिंदू एकनाथ शिंदेच राहिले आहेत. महायुतीचे प्रमुख नेते वेळोवेळी तेच ठामपणे सांगत होते. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळवत १३२ जागांवर विजय मिळवल्य़ानंतर मुख्यमंत्री भाजपचाच असेल अशी मागणी पुढे आली. मात्र शिंदे सेनाही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होती. एकनाथशिंदेंच्या माघारीनं भाजपचा मुख्यमंत्री होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं असताना आता गृहखात्यावर घोडं अडलं आहे. आज रात्री दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राज्यातील सरकार स्थापनेबाबत मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर