मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाकरे-आंबेडकर यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर शिंदेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले...

ठाकरे-आंबेडकर यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर शिंदेंची प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2023 04:10 PM IST

Eknath Shinde: शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde On Thackeray-Ambedkar Alliance
Eknath Shinde On Thackeray-Ambedkar Alliance

Thackeray-Ambedkar Alliance: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा करत राज्यात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, ठाकरे- आंबेडकर यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे हे मुंबईतील काळा घोडा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीवर भाष्य केलं. ‘भीम शक्ती आणि शिव शक्ती एकत्र, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

"माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी आणि परंपरेविरोधात प्रहार केला. परंतु आता राजकारणातील वाईट रुढी आणि परंपरांना मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर घराण्यातील आम्ही वारसदार एकत्र येत आहोत. सध्या जनतेला भ्रमात ठेवून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आता लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित एकत्र येत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या राज्यात आणि देशात जे काही सुरू आहे, ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. मोदींच्या सभेत कशा पद्धतीनं लोकं आणली गेली, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं घाणेरडं राजकारण आणि राजकारणातील वैचारीक प्रदूषण संपवण्यासाठी आम्ही युती करण्याचा निर्णय घेतलाय", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज- प्रकाश आंबेडकर

युतीची घोषणा करताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या उमेदवारांना जिंकवणं हे मतदारांच्या हातात आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात नाही. परंतु उमेदवारी देताना लोकांचं सामाजिकीकरण होत नाही. महाराष्ट्राची सत्ता सध्या केवळ ३६९ कुटुंबियांच्या आणि काही भांडवलदारांच्या हातात आहे. नात्यागोत्यांचं राजकारण सातत्यानं वाढत असून गरिबांचं राजकारण कमी होत आहे. त्यामुळं आता राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज असून त्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत येत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point