राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा अध्याप सुटलेला नाही. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा खल सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊनमुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल, असे विधान केल्याने मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोललेत जात असतानाच आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांकडे सोपवला म्हणजे त्यांनीमुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असा अर्थ होत नाही.नरेंद्र मोदी आणि अमित शहा सरकार स्थापनेबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणून एकनाथ शिंदे यांनी संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो, हे सगळ्यांना दाखवून दिले आहे. तसेच, न्याय-अन्यायाकडे बघण्यापेक्षा त्यांनी मतदार आणि मतदानाचा आदर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो आदर दिला आहे, ते देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच घडलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदय सामंत यांच्या विधानावरून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर शिंदेसेना अद्याप ठाम आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जर भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा केल्यास शिंदे सेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार, याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, उदय सामंत किंवा दादा भुसे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांना दिल्लीत संधी दिली जाण्य़ाची चर्चाही सुरू आहे.
उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत म्हणाले, काय बातम्या सुरू आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबध नाही. आमच्या पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना आहेत. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि भविष्यात देखील राहणार, असेही उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.