Maharashtra Politics : राहुल गांधी यांनी केलेल्या हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर लोकसभेमध्ये गदारोळ माजला. यावरून राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खंडाजंगी झाली. मात्र लोकसभेतील याचे पडसाद आता विधान परिषदेत उमटले आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार हमरी तुमरी झाली. बोट दाखवले तर बोट तोडण्याची हिंमत असल्याचे म्हणत सभागृहातच दानवे यांनी लाड यांना शिविगाळ केली. यानंतर लाड यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यानंतर सभागृहाचं कामकाज थांबवण्यात आलं.
पावसाळी अधिवेशनात चौथा दिवस खूपच वादळी ठरला. अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यामुळे विधानपरिषदेमध्ये एकच गोंधळ झाला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अंबादास दानवेंनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रसाद लाडही शिवीगाळ करू लागले.
प्रवीण दरेकर यांनी सभागृहात म्हटले की, सभापती महोदया, राहुल गांधी यांनी हिंदू हे हिंसक असल्याचे म्हटले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राहुल गांधी यांचा निषेध ठराव आणावा आणि सुमोटा आणावा. अशी आमची मागणी आहे. नाहीतर सभागृहाचा कामकाज चालू देणार नाही, अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर प्रसाद लाड म्हणाले की, हा प्रस्ताव लोकसभेला पाठवावा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्यांना इटलीला पाठवून द्या.
राहुल गांधींच्या विधानावरून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवे तसेच उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विंगेत येऊन प्रसाद लाड यांनी बेंच वाजवत राहुल गांधी यांच्या विरोधात नारेबाजी केली. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जेव्हा प्रस्ताव मांडण्यासाठी उभे राहिले, त्यावेळेस प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी पुन्हा राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसाद लाड हातवारे करत बोट दाखवत अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधत होते. त्यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला व त्यांनी रागाच्या भरात लाड यांना शिवी हासडली.