CM Eknath Shinde Sharad Pawar Meeting : महाराष्ट्राच्या राजकाराणात आज दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज ठाकरे व शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची भेट घेतली. शरद पवारांनी २ आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या अर्धा तास चर्चा झाली मात्र या चर्चेचा तपशील समोर आला नाही. मात्र त्यांच्यात पूर परिस्थिती व मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. २२ जुलै रोजीही शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्याबाबत महत्वपूर्वी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील बैठकीत आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच (Maratha Reservation) दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विकास कामं, पुण्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक बाबींवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आले होते.
मराठा व ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, तर ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध आहे. काही दिवसापूर्वी या प्रश्नावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र आज झालेल्या मुख्यमंत्री व शरद पवार बैठकीमुळे ही बैठक पुन्हा होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास,पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह अन्य विषयावर चर्चा झाली.