देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत असतात. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भाजपकडून पुन्हा येणार असल्याचे ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणून शपथविधीचे ठिकाणही सांगून टाकलं आहे. २०२४ मध्ये फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात भाजपकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं विधान केले.
देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा घोषणा भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळेंसह कार्यकर्त्यांनी दिल्या. नवीन सरकारमध्ये वानखेडे स्टेडियमवर पुन्हा नवीन शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा दावा बावनकुळेंनी यावेळी केला. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
चार राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया घेताना अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले की, मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील का, यावर त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आहेत. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून भाजपलाच आणतील. इतकंच मी सांगेन.
त्यानंतर आज बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केले. तसेच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं की, राज्यात फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ असूच शकत नाही.
जेव्हा-जेव्हा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा विषय येतो, तेव्हा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. मात्र भंडाऱ्यात बावनकुळेंनी थेट फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं विधान खळबळ माजली आहे.