legislative council elections : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठे वृत्त समोर आले आहे.११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांच्या अनेक बैठका आयोजित केल्या जात होत्या. त्यानंतर आता पाच जणांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून पाच उमेदवारांच्या नावाची घोषणी करण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून निसटता पराभव झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह पाच जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचं विधीमंडळातील संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात.
पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. अहमदनगर व बीड जिल्ह्यात तसे पोस्टरही लागले आहेत. लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी,अशी मागणी सातत्याने त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार असून यासाठी नामांकण दाखल करण्याची उद्या (मंगळवार) शेवटची तारीख आहे. त्याआधी आज भाजपाकडून आपल्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने महायुतीमधील मित्रपक्षांमधून सदाभाऊ खोत यांना संधी दिली आहे.
सध्या विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असं एकूण २०१ आमदारांचं पाठबळ महायुतीकडे आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे ३७, ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १३ आणि शेकाप व अपक्ष प्रत्येकी एक असे मिळून ६७, असं बलाबल आहे. त्यामुळे सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात. मात्र महायुतीकडून जर अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते.