काँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात महिला आमदार शिंदे सेनेत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात महिला आमदार शिंदे सेनेत

काँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात महिला आमदार शिंदे सेनेत

Oct 31, 2024 03:55 PM IST

Maharashtra Politics : आज एकाच दिवशी काँग्रेसला दोन जबर धक्के बसले. मुंबईत काँग्रेसचे अत्यंत जुने आणि अभ्यासू नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमधील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

रवी राजा व आमदार जयश्री जाधव यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
रवी राजा व आमदार जयश्री जाधव यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राज्यभरात दिवाळीचे फटाके फुटत असतानाच राज्यातील राजकारणातही आपटीबार सुरूच आहेत. आज एकाच दिवशी काँग्रेसला दोन जबर धक्के बसले. मुंबईत काँग्रेसचे अत्यंत जुने आणि अभ्यासू नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघातील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारीच्या गोंधळानंतर कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून कोल्हापूरमधील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

काँग्रेस पक्षाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या (Congress) प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. ते मुंबईतील सायन-कोळीवाडा मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने रवी राजा (Ravi Raja) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्याकडे संघटनेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत.

उमेदवारी नाकारताच विद्यमान आमदार शिवसेनेत -

कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी गुरूवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पक्षात प्रवेश करताना शिवसेनेने जाधव यांची उपनेतेपदी निवड केली आहे. तिकीट नाकारल्यामुळे जाधव नाराज होत्या. त्यांच्या नाराजीचा फायदा उठवत शिंदे सेनेचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीमोठा राजकीय डाव टाकत जाधव यांना आपल्या बाजुने वळवले व पक्षात प्रवेश घडवून आणला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी हा प्रवेश झाला. यावेळी क्षीरसागर यांच्यासह खासदार धैर्यशील माने,  माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित जाधव उपस्थित होते.

जयश्री जाधव यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, जयश्रीताई जाधव कोल्हापुरात मोठं संघटन उभं करतील. महिलांच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील. त्याचा फायदा समाजाला तसेच पक्षाला होईल. जयश्री जाधव यांच्यासोबतच सत्यजित जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते उद्योगजगताशी संबंधित आहेत. व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी सत्यजित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दोन्ही प्रवेशाने कोल्हापुरात शिवसेना मजबूत होईल,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या