मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : बाबरी मशिदीची वीट राज ठाकरेंना भेट म्हणून मिळाली, म्हणाले..

Raj Thackeray : बाबरी मशिदीची वीट राज ठाकरेंना भेट म्हणून मिळाली, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 06, 2024 05:07 PM IST

Raj Thackeray : बाळा नांदगावकर यांनी बाबरी ढाच्यातील वीट राज ठाकरेंनी भेट म्हणून दिली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, बाबरी पाडल्याचा हा पुरावा आहे. बाबरी मशिदीची वीट मिळाली आता राम मंदिराच्या बांधकामातील वीटही माझ्या संग्रही असावी, अशी इच्छा आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

राम मंदिर उद्घाटनानंतर देशभरातील कारसेवकांचे स्वप्न साकार झाले आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर सुद्धा बाबरी मशिद पाडताना तेथे उपस्थित होते. त्यांनी मशिदीच्या ढाच्यातील एक वीट आपल्यासोबत आणली होती. ती वीट आज त्यांनीमनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली आहे.

६ डिसेंबर १९९३ मध्ये जेव्हा बाबरी मशीद उध्वस्त करण्यात आली होती, तेव्हा बाळा नांदगावकर अयोध्येला कारसेवक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कारसेवकांनी पाडलेल्या बाबरी मशिदीची वीट आपल्या सोबत आणली होती. त्यानंतर राम मंदिराची प्रतीक्षा करत त्यांनी ३२ वर्ष ती वीट जपून ठेवली होती. त्यांनी प्रण केला होता की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर ती वीट बाळासाहेबांना भेट देणार. मात्र ३२ वर्षानंतर मंदिर अस्तित्वात आले. बाळासाहेब हयात नसल्यानं नांदगावकरांनी ही वीट बाळासाहेबांचे वैचारीक वारसदार म्हणून राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली आहे.

राज ठाकरेंनी वीट देताना बाळा नांदगावकर खुपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटले की, आज ३२ वर्ष झाले. तो प्रसंग आठवला की केवळ जय श्रीरामच्या घोषणा ऐकू येतात. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. बाळासाहेबांच्या जयंतीच्या एक दिवस म्हणजे २२ जानेवारी रोजी मंदिर लोकांसाठी खुलं झालं. बाबरी पाडली तेव्हा, काय सूचलं माहीत नाही पण मी तिथून ही वीट आणली होती. मी माजगावमध्ये जेव्हा कार्यालय बांधलं होतं, तेव्हा त्या कार्यालयाखाली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधव यांच्याकडे आहे. ते माझे जुने सहकारी असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं की, ६ डिसेंबरला बाबरीचा ढाचा पाडला त्यातील ही वीट आहे. हा बाबरी पाडल्याचा पुरावा आहे. बाळा नांदगावकर अयोध्येतून दोन विटा घेऊन आले होते. विटाचे वजन पाहून समजेल किती मजबूत आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खुप आनंद झाला असता.

राज ठाकरे म्हणाले की, २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत श्रीराम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. तमाम हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं. अयोध्येत राममंदिर व्हावं ही बाळासाहेबांची आणि लाखो कारसेवकांची तीव्र इच्छा होती जी पूर्ण झाली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील माझे ज्येष्ठ सहकारी बाळा नांदगावकर यांनी मला अयोध्येत कारसेवकांनी ज्या बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त केला, त्यातली एक वीट मला भेट दिली. ही वीट ही परकीय आक्रमकांना खूप शतकं सहन केल्यानंतर दिलेल्या उत्तराचं प्रतीक आहे, असं मला वाटतं.

ही वीट आज माझ्या संग्रही आली, आता राममंदिर ज्या विटांमधून उभं राहतंय, त्यातली एक वीट देखील माझ्या संग्रही असावी अशी माझी इच्छा आहे.  श्रीरामाच्या कृपेने लवकरच ती माझ्या संग्रही येईल, याची मला खात्री आहे.

WhatsApp channel