नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असतानाही आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिक यांनी अखेर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक आज व्यासपीठावर दिसून आल्याने त्यांनी आपली भूमिका उघड केली आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली, तसेच मुंबईतील काँग्रेसचा एक आमदारही अजित पवारांच्या गळाला लागला आहे.
राज्यात ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात'जनसन्मान यात्रा' सुरू आहे. जनसन्मान यात्रा आज मुंबईत होत आहे. या यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांचे कौतुक करताना नवाब मलिक यांच्या तुरुंगातील आठवणी सांगितल्या.
यावेळी अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यात येत असलेल्या जबाबदारीची घोषणा केली. सना मलिक माझ्याकडे वडिलकीच्या नात्याने अनेक कामं घेऊन येत असते. तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची कामं ती घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सना मलिक ही स्पोकपर्सन प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या कन्येकडे मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. सनाचं इंग्रजी,हिंदी चांगलं आहे,आता मराठीपण चांगला होईल, तू घाबरू नको, असेही अजित पवार यांनी म्हटले.
काँग्रेस आमदार झिशान सिद्धकी यांनी उघडपणे जनसन्मान यात्रेचं जोरदार स्वागत केल्यानं ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
झिशान सिद्धकी (Zeeshan Siddique) यांनी मुंबईत अजित पवारांच्या जनसन्मान रॅलीचं जोरदार स्वागत करत राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली आहेय आमदार या नात्यानं मी त्यांचं स्वागत केलं आहे,असं झिशान यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस विरोधातली खदखद लपून राहिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिशान सिद्धीकी यांचं कौतुक केलं आहे.
नुकत्याच पार प़डलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होतं. गुप्त मतदानामुळे आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु काँग्रेसनं झिशान सह सात जणांना ओळखल्याचं बोललं जातंय. त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.