Maharashtra Politics : पार्थ पवार शिरुर की मावळमधून लढणार? अजित पवारांनी दिलं उत्तर-maharashtra politics ajit pawars big statement regarding parth pawars contest in lok sabha ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : पार्थ पवार शिरुर की मावळमधून लढणार? अजित पवारांनी दिलं उत्तर

Maharashtra Politics : पार्थ पवार शिरुर की मावळमधून लढणार? अजित पवारांनी दिलं उत्तर

Jan 06, 2024 08:37 PM IST

Ajit Pawar On Parth Pawar candidacy : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत असताना पार्थ पवारांच्या लोकसभा उमेदवारीबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वहात असून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष रणनिती आखत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या लोकसभा उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

पार्थ पवार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असूनमावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणार उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारणा केली असता पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. तसेच येत्या काळात महायुतीचे जागावाटप लवकरच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित इतका मोठा नाही – अजित पवार

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीने शुक्रवारी छापेमारी केली होती. त्यानंतर रोहित पवार म्हणाले की, त्यांना वाटत असेल की, छापा मारल्याने मी भाजपसोबत येईन. तसेच छापा पडण्याच्या आठ दिवस आधी दिल्लीला कोण गेले होते, हे तपासा. असा प्रश्न प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला होता. याबाबत विचारल्यावर अजित पवार म्हणाले की,कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त आहेत. त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. माझ्यावरही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. जर काही केलं नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज यांनी किती सहकारी संस्था उभारल्या सांगावे -

सध्याचं सरकार हे सहारा चळवळ असल्याची टीकाराज ठाकरे यांनी कर्जत येथे आयोजित सहकार मेळाव्यात केली होती. यावरअजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी किती सहकारी संस्था उभारल्या हे सांगावे. मी आत्तापर्यंत ३२ वर्षात सहकारी संस्थांचं प्रतिनिधित्व करतोय. सहकारी बँकांमध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी बँका बुडतात व सर्वसामान्यांचे नुकसान होते.त्यामुळे सहकार चळवळ चालवणे इतके सोपे नाही. राज ठाकरे काहीही बोलतील, असा पलटवार पवार यांनी केला.