राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाअसून राष्ट्रवादी अजित पवारांचीच यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वपूर्ण निकाल देत शरद पवारांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि पक्ष चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचला होता. यावर आयोगात सुनावणी देखील पार पडली. ८ डिसेंबरला दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची याचा फैसला सुनावताना शिवसेनेवेळच्या निकालाचा कित्ता गिरवला. जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागलाआहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल, असं चित्र आहे.
अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचनाउद्या (बुधवार) संध्याकाळी चारवाजेपर्यंत द्यावी लागणार आहे.