तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला केवळ जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. यावेळी पराभवातून काहीतरी शिकून कष्ट घेतले होते. मेहनत केली होती. लोकसभेत आम्हाला केवळ एक जागा मिळाली. मागे एका लोकसभा निवडणुकीत मलाही माझ्या मुलास निवडून आणता आली नाही. या लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. मात्र आम्ही ईव्हीएमला दोष देत बसलो नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर केला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त केला होता.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी याचे कवित्व काही संपलेले नाही. अजूनही निकालावरून संशयकल्लोळ सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाच्या टक्केवारीवर संशय व्यक्त करत महाराष्ट्र निकालानंतर इतका शांत कधीच नव्हता, महायुतीला भरघोस बहुमत मिळूनही कुणालाच जल्लोष करावासा वाटत नाही. ज्यांच्या जीवनावर अजित पवार , भुजबळ हे मोठे झाले त्या शरद पवारांना केवळ १० जागा व अजित पवारांना ४५ जागा हे कुणालातरी पटेल का, असा घणाघात केला होते.
त्याचबरोबर आम्हाला झालेले मतदान मधल्या मध्येच गायब झाल्याचेही म्हटले. यावर तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना सणसणीत टोला लगावला. पुण्यात विभागीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडीवर भाष्य केलं.
राज ठाकरेंना मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही, आम्ही मेहनत केली, असा टोला लगावला.
राहुल गांधी यांनी मतदानाच्या टक्केवारीवर तसेच नव्याने समाविष्ट मतदारांबद्दल आरोप केला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, त्यांना जर एवढंच वाटत असेल तर त्यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी. मुळात ८तारखेला दिल्लीचा निकाल आहे त्यामुळे आधीच त्यांचं रडगाणं सुरू आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, यावर अजित पवार म्हणाले की,कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कोणावरही कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. काही पुरावे सादर केले आहेत. त्याची शहानिशा करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
संबंधित बातम्या