पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करताना अजित पवार आपल्या समर्थकांसह सत्ताधारी गटात सामील झाले होते. त्यानंतर त्यांना काही प्रकरणामधून क्लीन चिट देण्यात आली. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठीचे राज्यातील मतदान संपताच अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार त्यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) चौकशी पुन्हा सुरू केली आहे. राज्याच्या लाचलुचपत विभागाकडून ही चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून जरंडेश्वरची पुन्हा चौकशी सुरू करणं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू असल्याने महायुतीत संघर्षांची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार प्रचारात फारसे सक्रीय दिसले नाहीत.
एक वर्षापूर्वी अजित पवार भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर त्यांना चौकशीच्या फेऱ्यातून दिलासा मिळाला होता. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करत आरोपपत्रातून अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र त्याच प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू झाल्याने खळबळ माजली आहे.
या कारखान्याच्या चौकशीसाठी चौकशी पथक अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही जाऊन आले आहे. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाच टप्पे संपताच राज्य सरकारकडून पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात एसीबीकडून ही चौकशी केली जात आहे.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील चालवत होत्या. त्यावेळी कर्जात बुडालेल्या कारखान्याला वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यांनी कारखाना लिलावात काढला. गुरु कमोडिटी या खासगी कंपनीने हा कारखाना खरेदी केला. अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याची माहिती आहे.
जरंजेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टाने या बाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इडीकडून याची चौकशी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या