२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, पक्षफोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली. तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्याला शरद पवार हेच (Sharad Pawar) जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, १९७८ साली शरद पवारांनी जर अशा राजकारणाची सुरुवात केली नसती तर राजकारणात आताची परिस्थिती दिसली नसती. हे त्यांनी १९७८ ते १९९२ पर्यंत केलं. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते, पण शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शरद पवारांनी हात वर केले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे सगळं शरद पवारांनीचं सांगितल्याचेही राज ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी तेव्हा सुरु केलेल्या गोष्टीची पुढे सवय होत गेली. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटले की, जर मुख्यमंत्रीपदाबाबत तुमचं चार भिंतींच्या आड काही बोलणं झालं असेल तर ते तेव्हाच का नाही सांगितले. अमित शहा म्हणतात की, मी असं बोललोच नाही. माझा उद्धव आणि अमित शाह दोघांवरही विश्वास नाही.जेव्हा पंतप्रधान जाहीर भाषणात सांगतात की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, तुम्हा तेव्हाच त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता. जेव्हा तुम्हाला कळतं की,आमच्याशिवाय सरकार बनू शकत नाही त्यावेळी तुम्ही ही चर्चा सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे म्हणाले लाडकी बहीण योजनेचं काय होणार आहे यापेक्षा कोणतीच गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये, कारण तुमच्याकडे कोणी काही फुकट मागत नसतं. फुकटचा पैसा महिना, दोन महिने पुरेल, पण यामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीतून निघून कंगाल होईल त्याचे काय असा सवाल राज यांनी केला आहे. राज्यावरची अगोदरचीच कर्जे फिटलेली नाहीत, त्यात आणखी एक लाख कोटींवर कर्ज होईल, असे राज ठाकरे म्हणाले.
फुकट पैसे देऊन आपण लोकांना लाचार करत आहोत. कोणीही फुकट काही मागितलं नाही. लाडक्या बहिणींनी तरी कुठे म्हटले की फुकट द्या, त्यापेक्षा त्या भगिनींना सक्षम बनवा, चांगले उद्योगधंदे आणा. तरुणांना पैसा मिळाला तर ते काहीच कामधंदा न करता व्यसनाधीन होतील. त्यांच्याहातांना काम द्या, शेतकऱ्यांना नियमित व कमी दरात वीज द्या,असा सल्ला राज यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
संबंधित बातम्या