मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसमध्ये डॅमेज कंट्रोलला सुरुवात, राज्यातील प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेसमध्ये डॅमेज कंट्रोलला सुरुवात, राज्यातील प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 13, 2024 03:32 PM IST

Maharashtra Politics : काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या वाय बी सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली.

congress leader sharad pawars meeting
congress leader sharad pawars meeting

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ जवळ केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षीय पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचाही समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवारांसोबतच्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक आणि उमेदवारासंदर्भात काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ अजून काही आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बंडखोरी होण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर तोडगा काढण्याच्या आता जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून हालचाली सुरु झाल्यात.. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार हे जवळपास निश्चित झालंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरील पक्षांतर्गत रोष कमी करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुन्हा ताकद दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. बाळासाहेब थोरातांना राज्यसभा निवडणूक आणि पक्ष संघटना बांधण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अशोक चव्हाण राजीनाम्यावरुन भाजपवर टीका केलीय. स्वत:च्या कामगिरीवर जिंकता येत नाही, इतर पक्ष फोडून घर सजवण्याचं काम सुरु आहे असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय. 

WhatsApp channel