मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गट मनसेत जाणार? राजकीय समीकरण दिसतंय ओक्के पण..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
27 June 2022, 12:31 ISTSuraj Sadashiv Yadav
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 12:31 IST
  • एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दोनवेळा फोनवरून संवाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. शिवसेनेचे आमदार आणि मंत्रीही फुटले असून ते गुवाहाटीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४८ आमदार असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. यातच शिवसेनेकडून (Shivsena) अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे त्याविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यानं शिंदे गट मनसेत (MNS) विलीन होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असा गट स्थापन करण्यास शिवसेनेच्या घटनेमुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शिंदे गटासमोर इतर पक्षात विलीन होण्याचा पर्याय आहे. यात त्यांना मनसेमध्ये विलीन होणं हे सोयीचं ठरू शकतं असं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. भाजप किंवा इतर पक्षात जाण्याऐवजी मनसेमध्ये जाणं शिंदे गटाला फायद्याचं ठरू शकतं. यामुळे ठाकरे नाव आणि हिंदुत्ववादी विचार या दोन्ही कायम ठेवण्याची संधी असेल. हेच कारण देऊन मनसेमध्ये विलीनकरण करणं सोपं जाईल.

गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीला महत्त्व दिलं आहे. तसंच भाजपशी जवळीक वाढल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे जर मनसेत गट विलीन केला तर भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी मनसेही तयार होऊ शकते. वेगळा गट तयार करता आला नाही तर गट विलीनीकरणासाठी मनसेचा पर्याय एकनाथ शिंदे गटाला फायद्याचा ठरणार आहे.

…तर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
एकनाथ शिंदे यांनी ठरवले तरी मनसे तयार होऊ शकते का यावर पुढची राजकीय समीकऱणं ठरतील. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर मनसेला म्हणावं तसं यश मिळाले नाही. आता जर गट विलीन केला तर मनसेचे आमदार ४० च्या वर जातील. मनसेला असा फायदा होण्याची शक्यता असली तरी जे आमदार पक्षात येतील त्यांच्या मतदारसंघात सध्याच्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होऊ शकते.

राज ठाकरेंचा प्रतिसाद ठरेल महत्वाचा
राज ठाकरे यांनी नेहमची फोडाफोडीच्या आणि वाटाघाटीच्या राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांनी जरी अशी इच्छा व्यक्त केली तरी राज ठाकरे त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता कमी आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांच्यातील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

आमदारकी वाचवायची असेल तर…
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यातून वाचायचे असेल तर त्यांना दोन तृतीयांश आमदारांसह दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागेल. असा परिस्थितीत सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यांच्यासमोर प्रहार, मनसे, शेवटी भाजप असे पर्याय असले तरी एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.