मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: का उगाच वणवण भटकताय? चर्चेतून मार्ग निघू शकतो; सेनेची बंडोबांना साद

Sanjay Raut: का उगाच वणवण भटकताय? चर्चेतून मार्ग निघू शकतो; सेनेची बंडोबांना साद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 23, 2022 06:36 PM IST

Sanjay Raut's appeal to Shiv Sena Rebels:

Sanjay Raut appeal to Shiv Sena Rebells
Sanjay Raut appeal to Shiv Sena Rebells

Sanjay Raut appeal to Shiv Sena Rebels: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. काही मोजके आमदार वगळता इतर सर्वच आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं शिवसेना नेतृत्वाची पुरती कोंडी झाली आहे. बंडखोरांना परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

बंडखोर आमदारांच्या गटाकडून काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रस्ताव पाठवण्यात आला. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा हा प्रस्ताव होता. त्याला शिवसेनेकडून काल कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. उलट बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळं हा संघर्ष तीव्र झाला. नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद व शिवसेनेचं प्रमुख पद सोडण्याचीही तयारी दाखवली. त्यानंतर तरी बंडखोर आमदार परत फिरतील, असं वाटतं होतं. मात्र, तसं झालं नाही. उलट आज काही आमदार शिंदे यांना जाऊन मिळाले. त्यामुळं शिवसेनेसमोरचं संकट अधिकच वाढलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा आमदारांना आवाहन करताना महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याची तयारी दाखवली. मात्र, त्याआधी सर्व आमदारांनी मुंबईत यावं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढं भूमिका मांडावी, असं राऊत यांनी सांगितलं. मात्र, आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मग चर्चा करू, असा पवित्रा बंडखोरांच्या गटानं घेतल्याचं समजतं.

बंडखोरांच्या या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी आता आणखी एक ट्वीट केलं आहे. ‘चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राऊत यांच्या ट्वीटचा रोख भारतीय जनता पक्षाकडं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं राऊत हे पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. त्यामुळं त्यांनी आमदारांना गुलामी पत्करू नका असं म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या