मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Section 144 in Mumbai: शिवसैनिकांमध्ये संताप; मुंबईत कलम १४४ लागू

Section 144 in Mumbai: शिवसैनिकांमध्ये संताप; मुंबईत कलम १४४ लागू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 25, 2022 02:42 PM IST

ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शिवसेना भवनावर आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक
शिवसेना भवनावर आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक (फोटो - गिरीश श्रीवास्तव)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुण्यात (Pune) बालाजीनगरमध्ये आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे कार्यालय शिवसैनिकांकडून फोडण्यात आले. दरम्यान, मुंबई शहरात मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे.

मुंबई पोलिसांचे कायदा सुव्यवस्था उपायुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. शिंदे गटातील आमदार व नेते यांच्याही घराबाहेर आणि निवासस्थानी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

ठाण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत इतर आमदारांसह आहेत. आज सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या गटाची पत्रकार परिषद असून यात गटाचे नवे नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात सुरू आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या