Sanjay Raut| …म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत : संजय राऊत
इथं हवा, पाणी, डोगंर सगळं काही आहे. कोंबडी, बकरं सगळं महाराष्ट्रात आहे. तुम्ही इथे या असंही राऊत म्हणाले.
गुवाहाटीला गेलेले ४० आमदार हे जिवंत प्रेतं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "जे ४० वर्षांपासून पक्षात आहेत ते जातात, त्यानंतर जिवंत प्रेतं नाहीतर काय राहतं. मी सत्य बोलतोय तुमची मती कुंठीत झालीय. लोकांशी संपर्क तुटलाय. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप करत आहेत. मी कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीयेत.मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत."
ट्रेंडिंग न्यूज
मंत्री गुलाबराव पाटील गेल्यानं धक्का बसला नसल्याचंही संजय राऊत म्हणाले. केसरकर, सामंत आणि तिथे बसलेले सगळेच जवळचे आहेत. एकनाथ शिंदे हे सगळ्यात जवळचे होते. आमच्या घरी दर आठ दिवसाला भेटायचे, सुख-दुख वाटून घ्यायचो. एकनाथ शिंदे आजही आमचे जवळचे आहेत असंही राऊतांनी सांगितलं.
निलंबन रद्द करण्यासाठी न्यायालयात गेलेत ती कायद्याची लढाई आहे ती दोन्ही बाजूंनी होईल. तुमच्याकडे बहुमत आहे तर थांबलात कशाला? तुम्ही गुवाहाटीत का बसलाय? तिथे पूर आलाय, १२० जणांचा मृत्यू झालाय. तुमच्याकडे ५० जणांचा आकडा आहे तर इथं या, तुम्हाला कुणी रोखलं आहे? असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले.
लोकांचा रोष आणि संताप रोखू शकत नाही
आमच्या जीवाला धोका आहे असे आरोप बंडखोर आमदारांकडून केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर १५ आमदारांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. यावरूनही राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, हे फार हिंमतीचे लोक आहेत. आधी सुरत, मग गुवाहाटीला गेले. केंद्रीय यंत्रणा त्यांना सुरक्षा देतायत. भीती कसली आहे, महाराष्ट्राचे पोलिस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहेत. लोकांचा रोष, संताप याला तुम्ही रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला शेवटी भाजपची गुलामी पत्करून सुरक्षा मिळवावी लागते असा टोला राऊतांनी लगावला.
महाराष्ट्रात हवा, पाणी, डोंगर, कोंबडी, बकरं सगळं आहे
तुम्हाला खरंतर वणवण करायची गरज नाही. राज्य आपलं, माणसं आपली आहेत. इथं हवा, पाणी, डोगंर सगळं काही आहे. कोंबडी, बकरं सगळं महाराष्ट्रात आहे. तुम्ही इथे या असं आवाहन राऊतांनी केलं. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. त्यात ते काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं गुवाहाटीतलं वर्णन करताना ऐकायला मिळतात. यावरूनच राऊतांनी टीका केली आहे.
मुफ्तींशी संबंध असलेल्यांशी तुम्ही कसे संंबंध ठेवू शकता?
दाऊद इब्राहिमशी सबंध असलेल्यांसोब मरण आले तरी जाणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी रविवारी ट्विटरवरून सांगितलं. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांचे मेहबुबा मुफ्तींशी संबंध आहेत त्यांच्याशी तुम्ही कसे संबंध ठेवू शकता. पुलवामात ज्यांनी आरडीएक्स ठेवलं, ४० जवानांची हत्या झाली आणि आरडीएक्स कुणी ठेवलं हे माहिती नाही अशा लोकांसोबत तुम्ही बसता. भाजप मुफ्तींसोबत राहू शकते तर महाविकास आघाडीतील पक्ष तर याच मातीतले आहेत. एक उदाहरण दाखवावं की शिवसेनेनं हिंदुत्वाशी प्रतारणा केली. काश्मीरमध्ये काय चाललंय. कशी पाकिस्तानची घुसखोरी सुरू आहे. गलवानमध्ये काय चाललंय? हे हिंदुत्वाचे लक्षण आहे का? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.
ईडी आणि सीबीआय मतं मिळवून देणार नाही
आत्मा मेला असेल तर निष्ठेची अपेक्षा कशी करायची. ज्यांनी शिवसेनेसोबत आयुष्य काढलं ते जात असतील तर काय? काहींना डांबून ठेवलंय ते आल्यावर आमच्यासोबत येतील असा विश्वास पुन्हा एकदा राऊतांनी व्यक्त केला. शेवटी ते आमचे लोक आहेत. आम्ही अनेक वर्षे काम केलं आहे. सर्वांना उद्धव ठाकरेंनी ममतेनं सांभाळलं आहे. तुम्ही गैरफायदा घेऊन गेला असाल तर हे अमानुष आहे, महाराष्ट्राला पटणारं नाही. ईडी आणि सीबीआय मतं मिळवून देणार नाही असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
विभाग