मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काल वर्षा बंगल्यावरची गर्दी पाहून आनंद झाला, बंडखोर आमदाराचे पत्र व्हायरल
बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
23 June 2022, 7:39 AM ISTSuraj Sadashiv Yadav
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 7:39 AM IST
  • एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय आम्ही घ्यायला लावला, काल तुम्ही बोललात त्यातून मूळ प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत म्हणून हे पत्र लिहावं लागलं असं आमदाराने म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर लिहिलेल्या या पत्रात भावनिक होत शिवसेनेच्या आमदारांमध्ये असलेली खदखद व्यक्त करण्यात आली आहे. काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली, बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला अशा भावना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केल्या आहेत . संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत. पत्रात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आजुबाजुच्या लोकांनीच आम्हाला भेटू दिलं नाही, तासन्तास गेटवर उभा केलं अशी तक्रार केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीच थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे पण तिथेही तुम्ही कधी गेलाच नाहीत असंही सजय शिरसाट त्यांच्या पत्रात म्हणालेत. आमच्या सर्व अडीअडणची, गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला असेही शिरसाट यांनी पत्रात म्हटले.

पत्रात कोणते मुद्दे?
स्वपक्षीय असून आम्हाला वर्षा बंगल्यात प्रवेश नाही
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या बाजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आसायचे. तेव्हा अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा. मात्र तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय घ्यावा लागला
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

अयोध्येला जाण्यापासून आम्हाला का रोखले?
हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, ते कसे भेटायचे?
साहेब, जेव्हा आम्हाला वर्षांवर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्रं नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.

…म्हणून पत्र लिहावं लागलं
या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उपडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.