मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात नाट्यमय घडामोडी, प्रियांका गांधींनी मुंबईत घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

राज्यात नाट्यमय घडामोडी, प्रियांका गांधींनी मुंबईत घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 23, 2022 11:12 AM IST

बुधवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत चर्चा केली होती. त्यानंतर आज प्रियांका गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानं भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (फोटो - पीटीआय)

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ सुरू असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मुंबईत राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांची भेट घेतली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टांगती तलवार आहे. त्यातच आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मुंबईत राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे काल मुंबईत होते. त्यांनी काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशीही चर्चा केली. दरम्यान, प्रियांका गांधी या दुसऱ्या एका दौऱ्यावर जात असताना मुंबई विमानतळावर ४ तासांचा वेळ होता. त्या वेळेत त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.

प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वड्रा हे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांचे विमान मुंबईतून निघणार होते. त्यासाठी प्रियांका गांधी या मुंबई विमानतळावर आल्या होत्या. यावेळी त्यांना दुसऱ्या विमानासाठी तीन चार तासांचा वेळ होता. त्यामुळे या वेळेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना प्रियांका गांधी यांनी विमानतळावर बोलावून घेतले.

सकाळी सातच्या सुमारास प्रियांका गांधी या मुंबई विमानतळावर आल्या होत्या. तिथेच राज्यातील काँग्रेस नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. यानंतर प्रियांका गांधी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाल्या. राज्यातील सध्याच्या घडामोडींवर त्यांच्याशी प्रियांका गांधींनी चर्चा केल्याची माहिती मिळते.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता सरकार वाचवण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, ती रद्द करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या